धाराशिव प्रतिनिधी
येथील शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान आणि किसान वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या अकराव्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
वसंतराव काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. यंदाचे संमेलन सोमवार, २ फेब्रुवारी रोजी पळसप येथे होणार असून आमदार विक्रम काळे हे स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. संयोजकांच्या वतीने प्रा. डी. बी. जांभरूनकर आणि यशवंत कांबळे यांनी डॉ. सावंत यांना निवडपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार केला.
यापूर्वी या संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. भास्कर चंदनशिव, प्रा. दत्ता भगत, उत्तम कांबळे, प्रा. ललिता गादगे, इंद्रजित भालेराव, डॉ. जगदीश कदम, डॉ. वृषाली किन्हाळकर, अंजली धानोरकर आणि डॉ. आसाराम लोमटे यांसारख्या मान्यवर साहित्यिकांनी भूषविले आहे. संमेलनात परिसंवाद, कथाकथन आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येते.
डॉ. सुरेश सावंत यांची आजवर ५८ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना महाराष्ट्र शासनाचे तीन पुरस्कार तसेच विविध साहित्यसंस्थांचे ४५ पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रपती पुरस्कार, नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार, पुणे येथील अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार तसेच अलीकडेच कुसुमताई चव्हाण जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
डॉ. सावंत यांचे साहित्य शालेय तसेच विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. त्यांच्या बालकवितेवर संशोधन करून एका विद्यार्थ्याने एम. फिल. पदवी संपादन केली असून अनेक विद्यापीठांत त्यांच्या बालसाहित्यावर संशोधन सुरू आहे. वाचनसंस्कृती, बालसाहित्य आणि बालशिक्षण यावरील त्यांची पुस्तके अभ्यासकांसाठी संदर्भग्रंथ ठरली आहेत. त्यांनी आतापर्यंत १३५ पुस्तकांना प्रस्तावना किंवा पाठराखण केली आहे. अलीकडेच ‘रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
या साहित्य संमेलनात साहित्यिक व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


