पुणे प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नियमबाह्य मार्गांचा अवलंब केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशाच एका प्रकरणात मतदारांना चांदीच्या वाट्या आणि चमचे दिल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र तपासाअंती या भेटवस्तू खऱ्या चांदीच्या नसून केवळ चांदीचे कोटिंग करण्यात आलेल्या असल्याचे उघड झाले आहे.
पुण्यातील एका प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी या प्रकारच्या भेटवस्तू वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनसे नेते वसंत मोरे यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर संबंधित वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान वाहनातून पक्षाचे झेंडे, प्रचार साहित्य तसेच चांदीसदृश वाट्या आणि चमचे आढळून आले.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, खोट्या चांदीच्या भेटवस्तू देऊन मतदारांना फूस लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाहनातून जप्त करण्यात आलेले साहित्य
आयसुजु मोटर्स कंपनीचे व्ही-क्रॉस (काळ्या रंगाचे) वाहन, क्रमांक MH 12 WZ 8004
३१४ लहान पाकिटे; प्रत्येकात एक चांदीसदृश धातूची वाटी व एक चमचा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, घड्याळाचे चिन्ह असलेले २४ प्रचार पॅम्पलेट्स
पक्षाचे तीन झेंडे; त्यापैकी काहींवर प्रभाग क्रमांक ३८ मधील उमेदवार प्रकाश विठ्ठलराव कदम यांचे नाव
उमेदवाराची माहिती असलेली एक पुस्तिका
निवडणूक काळात अशा प्रकारच्या प्रलोभनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


