मुंबई प्रतिनिधी
रविवारी सुट्टीचा दिवस असला, तरी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी तो गैरसोयीचा ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा थेट फटका मुंबई लोकल सेवेला बसणार आहे. पश्चिम रेल्वेवर तब्बल १५३ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील काही स्थानकांवर लोकलचा थांबा पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार या स्थानकांवर लोकल गाड्या थांबणार नाहीत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी प्रवास व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ठाणे–वाशी–नेरुळ मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत अप व डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला जाणार असून, काही लोकल सेवा रद्द तर काही उशिराने धावणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी एकूण १५३ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अप मार्गावरील ७९ आणि डाऊन मार्गावरील ७४ लोकल गाड्यांचा समावेश आहे. हा ब्लॉक जलद मार्गावर रात्री १ ते सकाळी ६.३०, तर अप धीम्या मार्गावर रात्री १ ते पहाटे ४ या वेळेत असणार आहे.
मेगाब्लॉकमुळे होणारी गैरसोय लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी लोकलचे वेळापत्रक तपासण्याचा, शक्य असल्यास मेट्रो, बस किंवा इतर पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करण्याचा तसेच गर्दी टाळण्यासाठी नियोजनपूर्वक प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.


