मुंबई. प्रतिनिधी
राज्यभरात २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)चा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तरपत्रिकांची फेरपाडताळणी अंतिम टप्प्यात आली असून, उत्तरसूचीवर दाखल झालेल्या सुमारे पाच हजार हरकतींचा निपटारा करण्यात आला आहे.
परिषदेकडील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे १५ किंवा १६ जानेवारीपर्यंत टीईटीचा निकाल उमेदवारांच्या हाती येण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये सुमारे ९ हजार शिक्षक पदांची भरती होणार आहे. २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी संचमान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, प्रथम पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त पदे तसेच मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेत नव्याने टीईटी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना सहभागी होता येणार असल्याने, निकालाकडे उमेदवारांचे विशेष लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना दोन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून, त्यासाठी सप्टेंबर २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने एकूण तीन टीईटी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यापैकी पुढील परीक्षा जून २०२६ मध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात शिक्षक भरती प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


