मुंबई प्रतिनिधी
बदलापूर येथील शैक्षणिक संस्थेत घडलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटे यांची कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून करण्यात आलेली नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या नियुक्तीवर राज्यभरातून तीव्र टीका झाल्यानंतर अखेर भाजप प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशानुसार आपटे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असल्याचे पक्षाच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाल्यानंतर अवघ्याच काही दिवसांत हा निर्णय मागे घेण्याची वेळ पक्षावर आली. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आपण स्वतःहून राजीनामा दिला असल्याचे आपटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी हाताने लिहिलेल्या राजीनाम्याचे पत्रही पत्रकारांना दाखवले.
तुषार आपटे हे दोन वर्षांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत घडलेल्या दोन चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी होते. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. चौथीतील एका विद्यार्थिनीवर शाळेतील स्वच्छतागृहात सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले होते. नागरिकांनी रेल्वे वाहतूक रोखून धरली होती, तर काही दिवस शहर बंदही पाळण्यात आला होता.
या प्रकरणात शाळेच्या व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला होता. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यासह अक्षय शिंदे याच्यावर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाल आणि आपटे हे काही काळ फरार होते. अखेर ३५ दिवसांनी ठाणे गुन्हे शाखेने कर्जत येथील एका फार्महाऊसमधून त्यांना अटक केली. सध्या या प्रकरणाची सुनावणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे.
या गंभीर आरोपांनंतरही तुषार आपटे संबंधित शैक्षणिक संस्थेत कार्यरत असल्याचे समोर आले आहे. तसेच ते भाजपकडून स्थानिक पातळीवर राजकीयदृष्ट्या सक्रिय होते. मागील निवडणुकांमध्ये भाजपचे अनेक नगरसेवक निवडून आणण्यात त्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याचा दावा केला जात होता.
मात्र, लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या व्यक्तीची अशी नियुक्ती करण्यात आल्याने भाजपवर सर्वसामान्य नागरिकांसह विरोधी पक्षांनीही जोरदार टीका केली. ‘नैतिकतेचा निकष भाजपकडून पायदळी तुडवला जात आहे,’ असा आरोप विरोधकांनी केला आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशीलतेचा अभाव असल्याचे सांगत या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
अखेर वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर भाजपने माघार घेत आपटे यांचा राजीनामा स्वीकारल्याने हा वाद तात्पुरता शमला असला, तरी या घटनेमुळे पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर आणि राजकीय नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


