मुंबई प्रतिनिधी
२०२६ च्या दिनदर्शिकेसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या ‘माझ्या नजरेतून मुंबईचा ठसा’ या छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, ३१४ अटीतटीच्या प्रवेशिकांमधून १२ सर्वोत्तम छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या बहुरंगी जीवनाचा, तिच्या सांस्कृतिक आणि भावनिक पैलूंचा वेध घेणाऱ्या या छायाचित्रांनी परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या स्पर्धेत लोकमतचे चिफ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांच्या छायाचित्राने विशेष ठसा उमटवला. मरीन लाईन्स येथे तिरंगा फडकावत उभी असलेली युवती टिपणाऱ्या या प्रभावी छायाचित्राने परीक्षकांची मने जिंकत पुरस्कार पटकावला आहे. देशभक्ती, आत्मविश्वास आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याची पार्श्वभूमी यांचा सुरेख संगम साधणारे हे छायाचित्र यंदाच्या जानेवारी महिन्यात प्रकाशित झाले होते.

स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी ज्येष्ठ छायाचित्रकार मुकुंद सावंत, संतोष गांगण आणि शर्विन क्रास्टो यांनी सांभाळली. प्रत्येक छायाचित्रातील आशय, तांत्रिक कौशल्य आणि मुंबईचे वैशिष्ट्य अधोरेखित करण्याची क्षमता या निकषांवर काटेकोरपणे परीक्षण करण्यात आले. या उपक्रमाचे संयोजन अंशुमन पोयरेकर यांनी केले.
मुंबईच्या धावत्या जीवनातील क्षण, सामान्य माणसांचे भावविश्व, सण-उत्सव, निसर्ग आणि बदलते शहरी वास्तव यांचे प्रतिबिंब या निवडक छायाचित्रांतून दिसून येते. छायाचित्रणाच्या माध्यमातून शहराचा आत्मा जपण्याचा आणि तो व्यापक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
निवड करण्यात आलेली १२ छायाचित्रे आता २०२६ च्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार असून, मुंबईच्या नेत्रसुखद छायाचित्रण कौशल्याचा हा प्रवास दिनदर्शिकेच्या रूपाने कायमस्वरूपी ठसा उमटवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


