मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला सध्या कमालीचा वेग आला असताना, गुरुवारी एक अनपेक्षित आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ९३ मधील उमेदवार सुमित वजाळे यांनी थेट शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर जाऊन प्रचार केला.
“ठाकरे कुटुंब आमचे मतदार आहेत. आम्हाला त्यांना भेटायचे आहे. आमचे मुद्दे थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत,” असे म्हणत वजाळे यांनी मातोश्रीबाहेरील सुरक्षारक्षकांकडे भेटीची विनंती केली. ठाकरे कुटुंबातील कुणीही भेटले तरी चालेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कृतीची चर्चा काही वेळातच संपूर्ण मुंबईतील राजकीय वर्तुळात रंगली.
मुंबई महापालिका निवडणुकीकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचेही लक्ष लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच ठाकरे बंधू एकत्र येत सत्ताधारी भाजप आणि शिंदेसेनेसमोर थेट आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक प्रभागातील लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. अशा पार्श्वभूमीवर, प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या प्रचारशैलीने राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे.
मातोश्रीबाहेर थेट प्रचार
प्रभाग क्रमांक ९३ मधून निवडणूक लढवत असलेले सुमित वजाळे गुरुवारी आपल्या समर्थकांसह मातोश्रीबाहेर पोहोचले. “आम्ही याच प्रभागातून निवडणूक लढवत आहोत. मतदारांपर्यंत पोहोचणे, आमचे मुद्दे मांडणे हा आमचा हक्क आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आत प्रवेश मिळाला नाही. तरीही, मातोश्रीसमोर उभे राहून केलेला हा प्रचार राजकीयदृष्ट्या प्रतीकात्मक मानला जात आहे.
कोण आहेत सुमित वजाळे?
सुमित वजाळे हे शिंदेसेनेतील झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (आरपीआय) निवडणूक लढवली होती आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. यंदा त्यांना प्रभाग क्रमांक ९३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रभागात त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या उमेदवार रोहिणी कांबळे यांचे आव्हान आहे.
प्रभाग क्रमांक ९३ हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या बालेकिल्ल्यात शिंदेसेनेचे वजाळे आपले नशीब आजमावत असून, ठाकरे गटासाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरली आहे.
राजकीय संदेश की प्रचाराची नवी शैली?
शिंदेसेना आणि ठाकरे गट यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांची धार वाढलेली असतानाच, मातोश्रीबाहेर थेट प्रचार करण्याच्या या कृतीकडे केवळ प्रचार म्हणून नव्हे, तर एक राजकीय संदेश म्हणूनही पाहिले जात आहे. “मतदार कुणाचाही खासगी नसतो,” हा अप्रत्यक्ष संदेश यातून दिला गेला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अशीच अनपेक्षित व धक्कादायक वळणे पुढेही पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


