मुंबई प्रतिनिधी
राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. प्रचारसभा, बैठका, रणनीती यांचा धडाका सुरू असतानाच काही ठिकाणी पक्षांतर्गत अस्वस्थता आणि पक्षांतराच्या घटनांनी राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) डोंबिवलीतील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षातील अंतर्गत घडामोडींवर चर्चा रंगू लागल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नाराजीच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. विशेषतः संतोष धुरी यांनी पक्ष सोडल्यानंतर संदीप देशपांडे अस्वस्थ असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र या सर्व चर्चांवर संदीप देशपांडेंनी स्पष्ट आणि संयत शब्दांत भूमिका मांडली आहे.
“मला विश्वासात घेतलं नाही, पण तक्रार नाही”
एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत संदीप देशपांडे यांनी जाहीरनामा-वचननामा प्रक्रियेसंदर्भात भाष्य करताना सांगितलं की,
“संतोष धुरी पक्ष सोडल्यानंतर माझ्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. जाहीरनामा किंवा वचननामा तयार करताना मला विश्वासात घेतलं गेलं नाही. मात्र एखादी जबाबदारी मला दिली जाते तेव्हा ‘मलाच का?’ असा प्रश्न मी कधी विचारत नाही. आणि जर मला जबाबदारी दिली नाही, तर त्यावर राग व्यक्त करण्याचंही कारण नाही.”
राज ठाकरे यांच्या निर्णयांबाबत बोलताना देशपांडे म्हणाले,
“राज ठाकरेंना जर वाटलं असेल की संदीप या कामासाठी योग्य नाही, किंवा दुसरा कोणी ते अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो, तर तो त्यांचा अधिकार आहे. सगळंच मला येतं असा माझा फाजील आत्मविश्वास नाही. माझ्यापेक्षा बाळा नांदगावकर किंवा सरदेसाई काही गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात.”
“मी आक्रमक आहे, त्यामुळे गोष्टी बिघडू शकतात असंही वाटलं असेल”
आपल्या स्वभावाबाबतही संदीप देशपांडेंनी आत्मपरीक्षण केलं.
“मी स्वभावाने आक्रमक आहे. त्यामुळे काही वेळा गोष्टी बिघडू शकतात असंही त्यांना वाटलं असेल. जर त्यांना असं वाटत असेल की मी एखादी गोष्ट नीट हाताळू शकणार नाही, तर ते मान्य आहे. यामध्ये राग येण्यासारखं काहीच नाही,” असं ते म्हणाले.
“अॅसेट नसलो, तर लायबेलिटी होऊन राहणं चुकीचं”
नाराजीच्या चर्चांवर थेट उत्तर देताना संदीप देशपांडेंनी आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली.
“संतोष धुरीने जो निर्णय घेतला तो बरोबर की चूक, यावर मी भाष्य करणार नाही. त्याला जे योग्य वाटलं ते त्याने केलं. मात्र उद्या मला असं वाटलं की माझ्या पक्षात मी ‘अॅसेट’ न राहता ‘लायबेलिटी’ ठरलो आहे, तर मी स्वतःहून बाजूला होईन,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले,
“पक्षाने मला पोसायला हवं, मी ओझं ठरलो तरी चालेल, असा माझा अट्टाहास कधीच राहणार नाही. क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू सतत अपयशी ठरत असेल, बॅटला बॉल लागत नसेल, तर तो संघासाठी लायबेलिटी ठरतो आणि त्याने बाजूला झालं पाहिजे. राजकारणातही तेच तत्त्व लागू होतं.”
“अॅसेट असणं गर्वाची नव्हे, तर जबाबदारीची गोष्ट”
आपल्या भूमिकेचा निष्कर्ष काढताना संदीप देशपांडे म्हणाले,
“पक्षासाठी अॅसेट असणं ही गर्वाची नव्हे, तर जबाबदारीची गोष्ट आहे. आपल्या उपस्थितीमुळे पक्षाला अडचण येत असेल, तर आपण पक्षासाठी ओझं ठरतो. अजूनपर्यंत माझ्यावर अशी वेळ आलेली नाही. देव करो ती वेळ येऊ नये. पण जर आलीच, तर काय निर्णय घ्यायचा हे मी नक्की घेईन.”
महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेतील घडामोडी लक्षवेधी ठरत असताना, संदीप देशपांडेंचं हे स्पष्ट आणि संयत वक्तव्य पक्षातील अंतर्गत चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम देणारं ठरू शकतं.


