मुंबई प्रतिनिधी
राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या उमेदवारावर प्रचारादरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. प्रचार करत असताना उमेदवाराच्या पोटात चाकू भोसकण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ते वांद्रे परिसरात गेले असताना अचानक अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात कुरेशी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिक माहितीतून समजते.
१५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याने मुंबईत भाजप–शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत प्रचारादरम्यान घडलेल्या या हिंसक घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून, हल्ल्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात राजकीय वादातून हल्ला झाल्याची शक्यता तपासली जात असली, तरी पोलिसांनी अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून सर्वच पक्षांकडून हिंसाचाराचा निषेध करण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात वाढत चाललेली राजकीय कटुता आणि हिंसक प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.


