नाशिक प्रतिनिधी
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये व्हावे, यासाठी शहरातील साहित्यिक, सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र ही आशा अखेर मावळली असून, शंभरावे संमेलन पुण्यातच होणार असल्याची ठाम घोषणा झाल्याने नाशिकच्या साहित्यिक वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
साताऱ्यात नुकत्याच झालेल्या नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी शंभरावे साहित्य संमेलन पुणे येथेच होणार असल्याचे स्पष्ट केले. इ.स. १८७८ मध्ये पुण्यात पहिल्या ग्रंथकार संमेलनाने मराठी साहित्य संमेलनांची परंपरा सुरू झाली होती. त्या ऐतिहासिक सुरुवातीला शंभरावे संमेलन पुण्यातच भरवून हा वर्तुळ पूर्ण करण्याचा संकेत या घोषणेतून देण्यात आला. परिणामी इतर शहरांकडून आलेल्या प्रस्तावांचा विचार होणार नसल्याचेही स्पष्ट झाले.
नाशिकमध्ये यापूर्वी तीन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने शंभरावे संमेलन येथे झाल्यास त्याला आध्यात्मिक व सांस्कृतिक परिमाण लाभले असते. याच अनुषंगाने कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत साहित्य, शिक्षण, कला व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांशी सविस्तर चर्चा झाली होती. मराठा विद्या प्रसारक संस्थेने आयोजकपद स्वीकारण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र पुण्याची घोषणा झाल्याने हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
दरम्यान, नाशिकमध्ये होणाऱ्या चौथ्या विश्व मराठी संमेलनावरही अनिश्चिततेचे सावट आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्रांगणात हे संमेलन होणार असले तरी महानगरपालिका निवडणुकांमुळे डिसेंबर २६, २७ व २८ रोजीचे नियोजन पुढे ढकलावे लागले. त्यानंतर जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संमेलन होईल, असे राज्य मराठी विकास संस्थेकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र महानगरपालिका निवडणुकांनंतर लगेचच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यास संमेलन पुन्हा लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकच्या हातातून निसटले असताना, किमान विश्व मराठी संमेलन तरी ठामपणे नाशिकमध्ये व्हावे, अशी आग्रही अपेक्षा साहित्यप्रेमी व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.


