ठाणे प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेत नाराजीचा सूर अधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता पुढे पदावर काम करणे शक्य नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या निर्णयामागे अंतर्गत राजकारण असल्याची चर्चा सुरू आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विक्रांत वायचळ यांची हकालपट्टी आणि पक्षातील वाढती नाराजी यामुळे वातावरण तापले होते. माजी नगरसेवक भूषण भूईरे यांना तिकीट देऊ नये, या मागणीसाठी काही शाखाप्रमुखांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनात विक्रांत वायचळ यांचा समावेश होता.
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने विक्रांत वायचळ यांची हकालपट्टी केली. वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जात असल्याने या निर्णयानंतर शिंदे यांच्यात नाराजी निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
२०१७ मध्ये ठाणे महापालिकेत शिवसेनेने सर्वाधिक ६७ जागा जिंकल्या होत्या आणि मीनाक्षी शिंदे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना होऊ लागली.
मात्र, त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत मतभेद सार्वजनिक पातळीवर आल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदे ठाण्यातील आपला प्रभाव टिकवण्यासाठी प्रयत्नशील असून, महायुतीसोबतच्या चर्चाही सुरू आहेत. येणाऱ्या निवडणुकीत भाजपासोबत लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे युतीत आल्याने ठाण्यातील निवडणूक समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. त्यामुळे मीनाक्षी शिंदे यांच्या नाराजीचा तोडगा निघतो की ठाण्यातील शिवसेनेत नवे वादंग उभे राहतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


