सांगली, विटा प्रतिनिधी
विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)ने ऐतिहासिक विजय मिळवत तब्बल पन्नास वर्षांची राजकीय सत्ता उलथवून लावली. आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली बाबर गटाने नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून, या निकालामुळे विटा शहराच्या राजकीय इतिहासात नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र आहे.
खानापूर रस्त्यावरील बळवंत महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांची मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार काजल म्हेत्रे यांनी स्पष्ट आघाडी घेतली. प्रत्येक फेरीअंती ही आघाडी अधिकाधिक वाढत गेल्याने निकालाबाबतची उत्सुकता लवकरच निश्चिततेत बदलली.
दुसऱ्या फेरीतच शिवसेनेच्या उमेदवारांनी विविध प्रभागांतून आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाबर समर्थकांमध्ये उत्साह संचारला. दुपारी साडेबारा वाजता निकाल अधिकृतरीत्या जाहीर होताच शिवसेना (शिंदे गट)चे नगराध्यक्ष आणि २२ नगरसेवक निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. यानंतर शहरात जल्लोषाला उधाण आले.
निकालानंतर बळवंत महाविद्यालय परिसरात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. ध्वनियंत्रणांच्या गजरात विजयी उमेदवारांची मिरवणूक खानापूर रस्त्यावरील बळवंत कॉलेजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीत आमदार सुहास बाबर, विजयी उमेदवार अमोल बाबर यांच्यासह इतर नवनिर्वाचित नगरसेवक सहभागी झाले होते.
समर्थकांनी हातात फलक आणि पक्षाचे झेंडे घेत जल्लोष केला. मिरवणुकीत महिलांची लक्षणीय उपस्थिती विशेष ठरली. ठिकठिकाणी महिलांनी गुलालाची उधळण करत विजयाचा आनंद व्यक्त केला. शहरातील प्रमुख रस्ते आणि उपनगर गुलालाने न्हाऊन निघाले होते. सर्वत्र उत्सवाचे वातावरण दिसून येत होते.
ज्या-ज्या प्रभागांतून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, त्या-त्या प्रभागात स्थानिक मतदारांनी विजयी उमेदवारांचे जल्लोषी स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागांत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती.
पन्नास वर्षांच्या राजकीय वर्चस्वाला छेद
विटा नगरपालिकेची ही निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली आहे. गेली सुमारे पन्नास वर्षे माजी आमदार सदाशिव पाटील गटाकडे नगरपालिकेची सत्ता होती. मात्र यावेळी मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा कौल दिला. आमदार सुहास बाबर आणि त्यांचे बंधू अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सत्ता काबीज करत दीर्घकाळ टिकलेल्या राजकीय समीकरणांना छेद दिला.
या विजयामुळे विटा शहराच्या राजकारणात नवे नेतृत्व आणि नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विकास, पारदर्शक प्रशासन आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन नव्या सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले असून, या ऐतिहासिक निकालाकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


