सोलापूर प्रतिनिधी
मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी अवघ्या २२ वर्षांच्या सिद्धी राजू वस्त्रे यांची निवड झाली असून त्या राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरल्या आहेत. शिवसेनेच्या उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
मोहोळ शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबात सिद्धीचा जन्म झाला. त्यांच्या आजोबा कै. विश्वनाथ शिवराज वस्त्रे हे मोहोळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. सुमारे तीन दशकांपूर्वी त्यांनी सरपंचपद भूषविले होते. काँग्रेस विचारधारेचे असलेले कै. वस्त्रे शहरातील विविध प्रभागांतून ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही निवडून आले होते. त्यांच्या तीन मुलांपैकी राजू वस्त्रे यांची सिद्धी कन्या आहे.
सिद्धीने बी.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती गरड महाविद्यालयातून एम.कॉम.चे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच तिने एका सीए फर्ममध्ये नोकरीही केली आहे. वडील राजू वस्त्रे हे पूर्वी खासगी पतसंस्थेत कार्यरत होते. पतसंस्था बंद पडल्यानंतर सध्या ते शेती करत आहेत, तर आई तेजश्री या गृहिणी आहेत.
राजकारणात उतरण्याची कोणतीही ठोस इच्छा नसतानाही नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक नेत्यांशी झालेल्या चर्चेतून सिद्धीला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. चुलत भाऊ किशोर वस्त्रे व दिग्विजय वस्त्रे यांनी शिवसेनेचे रमेश बारसकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेकडून सिद्धीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर आणि पद्माकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक रणनीती आखण्यात आली.
नम्र स्वभाव, तरुणाईचा उत्साह आणि मतदारांशी थेट संवाद या बळावर सिद्धीने निवडणूक जिंकत अत्यंत कमी वयात नगराध्यक्षपदाचा मान मिळवला आहे.
विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सिद्धी वस्त्रे म्हणाल्या, “हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे. सर्वांना सोबत घेऊन मोहोळच्या विकासासाठी काम करणे हेच माझे उद्दिष्ट आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य अशा मूलभूत सुविधांवर विशेष भर देणार आहे.”
तरुण नेतृत्वाच्या रूपाने सिद्धी वस्त्रे यांची निवड मोहोळच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे.


