सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहरात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडामुळे मोठी खळबळ उडाली असताना, शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या गुन्ह्याचा छडा लावत तिघा आरोपींना अटक केली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या लुटीसाठी तृतीयपंथी (पारलिंगी) समुदायातील सामाजिक कार्यकर्ते व आगामी महापालिका निवडणुकीचे इच्छुक उमेदवार अयुब हुसेन सय्यद यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
सोलापूर शहरातील लष्कर परिसरात दोन दिवसांपूर्वी अयुब सय्यद यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला होता. शरीरावर गंभीर जखमा असून घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच हा खून असल्याचा संशय पोलिसांना होता. घटनेची माहिती मिळताच सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अयुब सय्यद हे तृतीयपंथी समुदायातील परिचित व्यक्तिमत्त्व होते. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ते प्रभाग क्रमांक १६ मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी प्रचाराची प्राथमिक चाचपणी सुरू केली होती. मात्र अचानक त्यांच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली असता संशयास्पद हालचाली टिपल्या गेल्या. या फुटेजच्या आधारे आरोपी लातूरकडे पळाल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर गुन्हे शाखेची पथके तातडीने लातूरकडे रवाना झाली. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या मदतीने संयुक्त कारवाई करत यशराज उत्तम कांबळे (वय २१), आफताब इसाक शेख (वय २४) आणि वैभव गुरुनाथ पनगुले (वय २३) या तिघांना अटक करण्यात आली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे तिघेही अयुब सय्यद यांच्या ओळखीचे होते. ओळखीचा फायदा घेत शुक्रवारी रात्री त्यांनी सय्यद यांच्या घरात प्रवेश केला. सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने त्यांनी खुनाचा कट रचून तिघांनी मिळून अयुब सय्यद यांची हत्या केली. या गुन्ह्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.
आरोपींनी सय्यद यांच्या घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन लुटला. यानंतर मयताची यामाहा दुचाकीही चोरून नेण्यात आली होती. पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या प्रकरणी तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे करीत आहेत.
सोलापूर पोलिसांच्या वेगवान आणि अचूक तपासामुळे हा गंभीर गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून, शहरात कायदा-सुव्यवस्थेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.


