सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर : दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि शेतीतील वाढत्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अवघ्या चार दिवसांत दोन शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे १८ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. प्रथमेश अनिल खरात असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
प्रथमेश हा बीबीदारफळ येथे कुटुंबासह राहत होता. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची आणि कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली होती. शेतीसाठी त्याने कर्ज घेतले होते. त्यातच दुष्काळामुळे विहिरीतील पाणी आटल्याने शेतीसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. सुमारे १५ दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे त्याच्या दोन जर्सी गायींचा मृत्यू झाला. शेतीचे नुकसान, कर्जाचा ताण आणि पशुधन गमावल्याने तो गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होता.
मध्यरात्री त्याने शेतातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच त्याचे चुलते सुनील खरात यांनी प्रथमेशला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे. प्रथमेशच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी बार्शी तालुक्यात कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून सुभाष भानुदास माळी या शेतकऱ्यानेही आत्महत्या केल्याची घटना घडली होती. अवघ्या चार दिवसांत दोन शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याने जिल्ह्यातील शेतीसमोरील संकट पुन्हा अधोरेखित झाले आहे.


