कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निकालांनी सत्ताधाऱ्यांचे गणित बदलले असले, तरी काही ठिकाणी मतदारांनी दिलेला संदेश अधिक ठळक ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नगरपंचायतीचा निकाल हा त्याचाच प्रत्यय देणारा ठरला. “नाद करायचा नाय, मतदार जागा हाय,” असा ठाम इशारा देत मतदारांनी घराणेशाहीला स्पष्ट नकार दिला आहे.
शिरोळ तालुक्यात हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक माने यांना त्यांच्या ‘होमपीच’वरच मोठा धक्का बसला. नगरपंचायतीच्या निवडणुकीत माने कुटुंबातील तब्बल तीन उमेदवारांना मतदारांनी पराभूत केलं. यामध्ये आमदारांचे पुत्र अरविंद माने, सून सारिका अरविंद माने आणि पुतण्या यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नगराध्यक्ष पदासाठी लढणाऱ्या सारिका माने यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला.
या निकालातून मतदारांनी घराणेशाहीच्या राजकारणाला स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. आमदार अशोक माने यांच्याकडून कुटुंबातील सदस्यांना राजकारणात पुढे आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र शिरोळच्या मतदारांनी तो हाणून पाडला. हा निकाल सध्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, शिरोळ नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील–यड्रावकर यांची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी आणि गणपतराव पाटील यांनी जोरदार आव्हान उभं केलं होतं. शिरोळ नगरपालिकेत महायुती आणि ताराराणी आघाडी यांची युती होती; तरीही सत्ताधाऱ्यांना मतदारांचा रोष झेलावा लागला.
अशोक माने नेमके कोण?
अशोक माने हे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उमेदवारी करत काँग्रेसचे उमेदवार राजू आवळे यांचा तब्बल ४६ हजार २४९ मतांनी पराभव केला. राजू आवळे हे २०१९ ते २०२४ या कालावधीत हातकणंगलेचे आमदार होते. २०१९ मध्ये अशोक माने यांनीही जनसुराज्य शक्तीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती; मात्र तेव्हा ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
शिरोळचा हा निकाल केवळ स्थानिक सत्ताबदलापुरता मर्यादित न राहता, राज्यातील राजकारणाला महत्त्वाचा इशारा देणारा ठरतो आहे. मतदार आता आडमुठ्या घराणेशाहीच्या राजकारणाला माफ करायला तयार नाहीत, हेच यातून अधोरेखित झालं आहे.


