कोल्हापूर प्रतिनिधी
फुलेवाडी परिसरात चालवण्यात येणाऱ्या खासगी भिशी योजनेत तब्बल आठ कोटी रुपये अडकल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, वाढत्या आर्थिक तणावाला तोंड देऊ न शकल्याने भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजू मोरे यांनी गुरुवारी पहाटे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने फुलेवाडी तसेच कोल्हापूरच्या राजकीय व आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या त्यांच्यावर लक्ष्मीपुरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
वाढत्या तगाद्यामुळे ताण
मोरे हे गेल्या काही वर्षांपासून प्रमिलाराजे खानविलकर सहकारी पतसंस्था या नावाने खाजगी भिशी चालवत होते. तब्बल २४ टक्के व्याजदराचे आमिष दाखवत फुलेवाडी आणि परिसरातील नागरिक, महिला, तसेच शासकीय कर्मचारी यांच्याकडून गुंतवणूक गोळा करण्यात आली होती. सुरुवातीला काही सभासदांना टक्केवारीनुसार परतावा दिला गेला; मात्र यंदा दिवाळीच्या सुमारास काही कर्जदारांनी संस्थेला देय असलेली रक्कम परत केली नाही. त्यामुळे संपूर्ण भिशी योजनेवर गंडांतर आले.
गुंतवणूकदारांचा जमाव, अफवा आणि तणाव
गुरुवारी भिशी फुटणार असल्याच्या बातमीने सकाळपासूनच पतसंस्थेच्या कार्यालयाबाहेर दोनशेहून अधिक नागरिक आणि महिला सभासद जमा झाले. अफवांच्या धुरळ्यात वातावरण तापत गेले. वाढत्या तगाद्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी विष प्राशन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी घटनेची पुष्टी केली.
गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार
चौकशीत प्रारंभी उघडकीस आलेल्या माहितीनुसार, भिशीतील काही कोटी रुपये बेळगाव परिसरातील खासगी व्यवहारांत गुंतवण्यात आले होते. संबंधित व्यवहारांतील एक महत्त्वाचा देणेकरी मृत्युमुखी पडल्याने मोठी रक्कम परत मिळण्याची शक्यता क्षीण झाली. परिणामी गुंतवणूकदारांचे पैसे अडकत गेले. परिसरात निर्माण झालेल्या या गोंधळामुळे भय आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
फुलेवाडीतील या भिशी प्रकरणाने कोल्हापुरात पुन्हा एकदा अनियमित आर्थिक योजनांचा धोका आणि त्यातून निर्माण होणारे संकट अधोरेखित केले आहे.


