मालेगाव प्रतिनिधी
मालेगाव शहरातील रावळगाव नाका परिसरात सुरू असलेल्या एका अंध निवासी शाळेतील गंभीर गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर त्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी संबंधित संस्थेचे अपील फेटाळून लावत दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
‘अंध शिक्षण व प्रशिक्षण संस्था’ या नावाने चालविल्या जाणाऱ्या या शाळेविरोधात बनावट विद्यार्थी संख्या दाखवून शासनाच्या अनुदानाची लूट केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. प्रत्यक्षात केवळ सात अंध विद्यार्थी असताना कागदोपत्री तब्बल ५० विद्यार्थी दाखविण्यात आले. तसेच २४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दर्शवून वेतन, भत्ते आणि वसतिगृह अनुदानाची रक्कम लाटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची दखल घेत नाशिक जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन तपासणी केली. तपासात तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे पाठवला. त्यानुसार ३ मे रोजी आयुक्तांनी मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले.
या आदेशाविरोधात संबंधित संस्थाचालकांनी दिव्यांग कल्याण विभागाकडे अपील दाखल केले होते. मात्र, अपीलावरील सुनावणीनंतर सचिव तुकाराम मुंढे यांनी आयुक्तांचा निर्णय कायम ठेवत अपील फेटाळले. त्यामुळे संस्थाचालकांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, केवळ मान्यता रद्द करणे पुरेसे नसून, वर्षानुवर्षे करण्यात आलेल्या आर्थिक फसवणुकीची रक्कम शासनाकडे वसूल करण्यात यावी, तसेच जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार द्यानद्यान यांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू राहील, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली आहे.


