मुंबई प्रतिनिधी
जोगेश्वरीच्या गजबजाटात एका क्षणात सर्व काही थांबल्यासारखं झालं. खोल नाल्यात पडलेल्या एका आजोबांचा जीव धोक्यात होता, आणि आसपासच्या लोकांचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. कोणी धजावत नव्हतं… भीती, गोंधळ आणि जीव वाचवण्याची धडपड, याच अवस्थेत कुणीतरी वर्दीला हाक मारली.
आणि मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं, वर्दी ही केवळ अधिकाराची नसून, त्यामागे मानवतेची धडधडही आहे.
पोलिस पथक घटनास्थळी पोहोचलं, क्षणाचाही विलंब न करता जवानांनी नाल्यात उतरायचा निर्णय घेतला. ती जागा अंधारलेली, चिखलाने भरलेली, कोणत्याही क्षणी जीवाला धोका निर्माण करणारी… पण पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार न करता थेट नाल्यात उडी घेतली. काही मिनिटांचा ताण, संघर्ष आणि जीवाच्या आकांतात सुरू असलेला प्रयत्न, आणि अखेर पोलिसांनी त्या आजोबांचा हात घट्ट पकडून त्यांना मृत्यूच्या दारातून बाहेर ओढलं.
हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि मुंबई पोलिसांच्या अधिकृत X अकाउंटवर शेअर होताच क्षणात व्हायरल झाला. हजारो लोकांनी तो व्हिडिओ पाहत अंगावर काटा आल्याची भावना व्यक्त केली. प्रतिक्रिया एकच “हे आहेत खरे मुंबई पोलीस!”
बर्याचदा पोलीस दलावर टीकेची धार वळवली जाते. पण अशा घटनांमधून हे सिद्ध होतं की पोलिसांची वर्दी फक्त नियम अंमलात आणण्यासाठी नाही, तर प्रसंगी जीव धोक्यात घालून एखाद्याच्या आशेचा किरण बनण्यासाठी आहे.
वाचवलेले आजोबा सध्या रुग्णालयात उपचाराखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र ते नाल्यात पडले कसे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
पण या एका व्हिडिओने अनेकांचे मन जिंकलं आहे.
कारण ही फक्त बचावाची कथा नाही, ही कर्तव्यनिष्ठेची, धैर्याची आणि मानवतेची खरी कहाणी आहे.


