मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला अखेर अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले असून येत्या 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास तो भारतात दाखल होण्याची अपेक्षा आहे. अनमोल हा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असून भारतात आल्यानंतर कोणत्या एजन्सीच्या ताब्यात त्याला दिले जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली पोलिसांचे पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशभरात अनमोलवर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याची कोठडी कोणत्या एजन्सीकडे जाईल, हे अखेर केंद्र सरकारच ठरवणार आहे.
बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांकडून त्यांना आज सकाळी ईमेल मिळाला असून त्यात अनमोल बिश्नोईला अमेरिकन फेडरल एजन्सींनी हद्दपार केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. “मी पीडित कुटुंबाचा सदस्य असल्याने या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीची माहिती मला देण्यात येते. आज मिळालेल्या ईमेलमध्ये बिश्नोईला अमेरिकेबाहेर काढल्याची माहिती देण्यात आली,” असे झीशान यांनी सांगितले.
या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांना अटक केली असून दाखल केलेल्या आरोपपत्रात अनमोल हा हत्येचा कट रचणारा असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईल फोनमधून पोलिसांनी अनमोलच्या आवाजाशी मिळतीजुळती अनेक व्हॉइस क्लिप जप्त केल्या आहेत. त्यात हत्या करण्याच्या सूचनांचा उल्लेख असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
सलमान खानवर झालेल्या गोळीबार प्रकरणातही अनमोलचा सहभाग असल्याने या गुन्ह्यांमध्ये मकोका लावण्यात आला आहे.
अनमोल बिश्नोईच्या भारतात येण्याने प्रकरणाच्या चौकशीला नवी दिशा मिळणार असली, तरी पुढील पाऊल कोणत्या तपास संस्थेचे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


