सातारा प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील निनाम पांगळी परिसर सहा महिन्यांपासून शांततेने जगत होता. पण या शांततेच्या आड दडलेला एक थरारक गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. गावातील 43 वर्षीय शेतमजूर अचानक बेपत्ता झाल्याची नोंद जून 2025 मध्ये झाली होती; मात्र पोलिसांच्या तपासात हा साधा बेपत्ता होण्याचा प्रकार नसून खून असल्याचा धक्कादायक सत्यसमोर आलं आहे. या प्रकरणात गावातीलच एका माजी सैनिकास अटक करण्यात आली आहे.
बेपत्ता नोंदीमागे दडलेला खुनाचा गुन्हा
संभाजी बाळू शेलार (वय 43) हे मजुरी करून संसाराचा गाडा हाकणारे शेतमजूर. 8 जून रोजी ते घरातून बाहेर पडले आणि पुन्हा दिसलेच नाहीत. कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी केलेल्या सर्व शोधांनंतरही संभाजी यांचा मागमूस लागला नाही. अखेरीस बोरगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद करण्यात आली.
सुरुवातीला साधा बेपत्ता प्रकार समजून तपास सुरू होता; मात्र काही दिवसांपूर्वी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीने संपूर्ण तपासाचे पारडेच बदलून टाकले.
संशयाच्या भोवऱ्यात माजी सैनिक
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचे लक्ष गावातील भरत उर्फ मधू रंगराव ढाणे (वय 48) या निवृत्त सैनिकाकडे गेले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला ढाणे याने चौकशीत पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण कड्या चौकशीखाली अखेर त्याने पापाची कबुली दिली.
पैशांवरून वाद, जीवावर बेतला राग
तपासात उघड झाल्यानुसार ढाणे यांच्या घरातील कपाटातील काही रक्कम चोरी गेल्याचा संशय शेलार यांच्यावर ढाणे यांना होता. या संशयावरून दोघांत वाद झाला आणि संतापाच्या भरात ढाणे याने धारदार शस्त्राने शेलार यांची हत्या केली.
पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न
गुन्ह्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने ढाणे याने मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह घरामागील जागेत नेऊन लाकडांच्या ढिगाऱ्यात जाळला. मृतदेहाची राखही दूर फेकून दिली, जेणेकरून पोलिसांना कोणताही पुरावा मिळू नये.
सहा महिने दडलेलं भीषण सत्य
घटना घडून सहा महिने उलटले तरी कोणालाही संशय आला नाही. मात्र पोलिसांनी मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या सखोल तपासात अखेर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. आरोपीच्या कबुलीनंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ढाणे याला अटक करण्यात आली आहे.
या अमानवी कृत्यामुळे निनाम पांगळी परिसरात खळबळ उडाली असून निवृत्त सैनिकाकडून असा गुन्हा घडल्याने ग्रामस्थ स्तब्ध झाले आहेत. पुढील तपास सातारा पोलिसांकडून सुरू आहे.


