सातारा प्रतिनिधी
सातारा, ता. १४ : शहरात वाढत्या बॅटरी चोरीच्या घटनांना आळा घालत शाहुपुरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पिलेश्वरीनगर, करंजे येथील दत्ता बबन ठोंबरे (वय ३३) यास अटक करून त्याच्याकडून तब्बल १० चोरीच्या बॅटऱ्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. जप्त मालाची किंमत सुमारे ५५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
झेडपी कॉलनी, म्हसवेरोड, करंजे येथे उभ्या असलेल्या ट्रकवरील अॅमरॉन कंपनीच्या दोन बॅटऱ्या (मूल्य १५ हजार) चोरीस गेल्याची फिर्याद रमेश रघुनाथ शेडगे यांनी ६ नोव्हेंबर रोजी शाहुपुरी पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना चोरी परिसरातीलच एका व्यक्तीने केल्याची गोपनीय माहिती मिळाली. तांत्रिक तपास, बातमीदारांची माहिती आणि फिर्यादींच्या सूचनांच्या आधारे पोलिसांनी संशयित दत्ता ठोंबरे यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मागील तीन महिन्यांत वाढेफाटा व करंजे परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांमधून बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी एकूण १० बॅटऱ्या हस्तगत करून गुन्हा उघड केला.
या प्रकरणाचा पुढील तपास म.पो.हवा. सोनाली माने करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सचिन म्हेत्रे, पो.उप.नि. विजय शिर्के, म.पा. हवा. सोनाली माने, पो.हवा. निलेश काटकर, सुरेश घोडके आणि संदीप मदने यांच्या पथकाने केली.


