नवी दिल्ली वृत्तसंस्था
लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाने राजधानी दिल्ली हादरली आहे. या घटनेनंतर तपास यंत्रणांनी चौकशीचा वेग वाढवला असून आता सोशल मीडियालाही रडारवर घेतलं आहे. स्फोटाच्या आधी आणि नंतर परिसरात कार्यरत मोबाईल क्रमांकांचा डंप डेटा गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. या डेटामधून संशयितांच्या हालचाली, संवाद आणि संपर्कांचे महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
लाल किल्ला पार्किंग आणि त्याच्या आसपासच्या परिसरात कार्यरत असलेल्या सर्व मोबाईल फोनचा डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. स्फोट घडवणाऱ्यांनी एकमेकांशी कोणत्या मार्गाने संपर्क साधला होता, याचा मागोवा घेण्यासाठी हा डेटा उपयुक्त ठरू शकतो, असा तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
तसेच फरीदाबाद परिसरातही संशयितांनी एकमेकांशी काय संवाद साधला होता हे डंप डेटाच्या आधारे उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तपासातून स्फोटाशी संबंधित व्यक्तींचे जाळे आणि त्यांची हालचाल स्पष्ट होईल, असा विश्वास तपास अधिकाऱ्यांना आहे.
डंप डेटा म्हणजे काय?
नावाप्रमाणेच डंप डेटा म्हणजे वापरात नसलेला, पण संग्रहित केलेला मूळ (Raw) डेटा. दररोज लाखो लोक मोबाईलद्वारे संवाद साधतात, परंतु त्यातील बहुतांश माहिती लगेच वापरात येत नाही. हा डेटा बॅकअप स्वरूपात राहतो. त्यामध्ये कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस, व्हॉट्सॲप चॅट्स, डिलीट झालेले फोटो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील माहिती, ब्राऊझर हिस्ट्री इत्यादीचा समावेश असतो.
या डेटामधून केवळ कॉल लॉग नव्हे, तर मोबाईल किंवा लॅपटॉपमधील डिलीट झालेला डेटा सुद्धा पुन्हा प्राप्त करता येतो. त्यामुळे सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांसाठी हा तपासातला सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जातो..
डेटा रिकव्हर करण्यास किती वेळ लागतो?
अँड्रॉइड फोनमधून डंप डेटा रिकव्हर करण्यासाठी सरासरी दोन ते सहा तास लागतात. आयफोनसारख्या अत्याधुनिक उपकरणांतून डेटा मिळवण्यासाठी २४ ते ७२ तास लागू शकतात. त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा (FSL) अहवाल तयार होण्यासाठी १५ दिवसांपासून सहा महिने लागू शकतात.
तथापि, जर फोन फॅक्टरी रीसेट झाला असेल, डेटा ओव्हरराईट झाला असेल किंवा डिव्हाइसची चीप खराब असेल, तर डेटा परत मिळवणे शक्य नसते.
तपास यंत्रणांनी लाल किल्ल्याजवळील स्फोटाच्या ठिकाणी तांत्रिक पुरावे गोळा करण्यासह डिजिटल सुगावा शोधण्यावर भर दिला आहे. सोशल मीडिया आणि मोबाईल डेटा यांच्या छाननीतून नेमके कोण, कधी आणि कसे या कटात सामील होते, हे स्पष्ट होईल. आता पुढील काही दिवसांत या तपासातून अनेकांचे नाव उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


