नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटना अक्कलकुवा-मोलगीला जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरातील आमलिबारी शिवारात घडली. ही बस मोलगी गावाहून अक्कलकुव्याकडे विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना, घाटातील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट खोल दरीत कोसळली.
स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार, या बसमध्ये 20 ते 30 विद्यार्थी प्रवास करत होते. हे सर्व विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे आश्रम शाळेचे असल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यासाठी दोन बस रवाना झाल्या होत्या, त्यातील एक बस या भीषण अपघाताची शिकार झाली.
अपघातानंतर बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, दरीतील दृश्य अतिशय भयावह आहे. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी तातडीने पंचनामा सुरू केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. चालकाचे नियंत्रण सुटणे हेच अपघाताचे प्राथमिक कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी अशा दुर्गम आणि धोकादायक घाटमार्गांवरून शाळा बसचे वाहतूक नियमन करण्याची मागणी केली आहे. “नियोजनाचा अभाव आणि घाटातील अपुरी सुरक्षा उपाययोजना यामुळेच अशा घटना घडतात,” अशी प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून, रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांना तात्काळ संपर्क साधण्यात आला आहे.
ही दुर्घटना दिवाळीनंतरच्या आनंदाला काळी छाया ठरली असून, संपूर्ण नंदुरबार जिल्हा या घटनेने हादरला आहे.


