मुंबई प्रतिनिधी
मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे… ते कोण हे तुम्हाला माहितीच आहे! अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.
मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी भाजपवर आगपाखड करत ‘मुंबई गिळायला निघालेले अॅनाकोंडा साप’ असा थेट टोला लगावला.
“भाजप आणि शिंदे यांच्या गटाकडे पैसा आहे, पण जीवाला जीव देणारी माणसं नाहीत,” असा टोला ठाकरेंनी लगावला.
दसऱ्याच्या मेळाव्याचा उल्लेख करताना ते म्हणाले, “त्या दिवशी पाऊस पडत होता, पण तुमच्या उत्साहासमोर पाऊसही फिका पडला. काही जण पावसाच्या फटक्यातून वाचले, नाहीतर आणखी फटकावणार होतो.”
उद्धव ठाकरे यांनी यावेळी संघटनात्मक पातळीवरील संवादावरही भर दिला. “मी विभाग प्रमुखांना नेहमी भेटतो, शाखाप्रमुखांच्या बैठका घेतो. पण उपशाखाप्रमुखांची बैठक घेण्याची इच्छा होती. आज ती बैठक सभा झाली आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, “उपविभागप्रमुखांकडे तीन शाखा असतात, शाखाप्रमुखांकडे महापालिका वॉर्ड, तर उपशाखाप्रमुखांकडे दोन ते तीन मतदार याद्या येतात. आदित्य ठाकरे यांनी वरळीतील मतदार याद्यांमधील घोळ दाखवून दिला आहे. आता हे काम संपूर्ण महाराष्ट्रात करायचं आहे, आणि त्याची सुरुवात मुंबईतून होणार आहे.”
अमित शाह यांच्या मुंबई दौर्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “आज एकजण येऊन गेला. ‘सामना’त दोन बातम्या पाहिल्या, पहिल्या पानावर भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि आतल्या पानावर ‘जिजामाता उद्यानात अँनाकोंडा येणार’. आम्ही पेंग्विन आणले, आणि काही पेंग्विनच्या बुद्धीचे लोक आमच्यावर टीका करतात. पण अॅनाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप, आता तो येऊन गेला आहे. त्यांना मुंबई गिळायची आहे, पण ती कशी गिळतात ते आपण बघणारच.”
“त्यांनी स्पष्ट इशारा दिला”
“महाराष्ट्रासाठी आम्ही रक्त सांडलं आहे. मुंबईवर चाल करून याल, तर तुम्हाला आडवं करू!”
शिवसेनेच्या या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक भाषणाने कार्यकर्त्यांत उत्साहाचं नवीन संचार निर्माण झालं.


