मुंबई प्रतिनिधी
मुंबई काँग्रेसतर्फे आज सिद्धिविनायक मंदिराजवळ भव्य आंदोलन करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आवाज बुलंद करण्यात आला. या आंदोलनाचं नेतृत्व खासदार वर्षा गायकवाड यांनी केलं. ‘ही भाजपची महाराष्ट्रद्वेषी सरकार आहे, जी केवळ सत्ता आणि पैसा यासाठी जन्माला आली आहे,’ असा आरोप त्यांनी यावेळी केला.

वर्षाताई म्हणाल्या, “युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर कवी आचार्य अत्रे, तसेच आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू आणि संजय गांधी यांनी देशाला विचार, मूल्य आणि दिशा दिली. पण आजचं हे बाजारू सरकार त्या महापुरुषांच्या नावांचा बाजार मांडत आहे. आपला ऐतिहासिक वारसा, अभिमान आणि परंपरा हे सरकार कंपन्यांना विकतंय!”
त्यांनी पुढे म्हटलं, “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला बँकेचं नाव लावणं, आचार्य अत्रे चौकाला म्युच्युअल फंडाचं नाव जोडणं, ही महाराष्ट्राच्या अभिमानाची थेट खिल्ली आहे. जनतेच्या सेवेसाठी नव्हे, तर नावं, प्रतीकं आणि इतिहास विकून पैसा कमवण्यासाठीच हे सरकार सत्तेवर आलं आहे.”
वर्षा गायकवाड यांनी याच सरकारवर महापुरुषांचा सातत्याने अपमान केल्याचा आरोपही केला. “कधी डॉ. आंबेडकरांविषयी अपमानास्पद वक्तव्यं केली, कधी छत्रपतींच्या आदर्शांची थट्टा केली, तर कधी महाराष्ट्राच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह उभं केलं. आता तर या महाराष्ट्रद्वेषी सरकारनं आपल्या महान परंपरेलाच कॉर्पोरेट जाहिरातीच्या फलकात रूपांतरित केलं आहे,” असा त्यांचा आरोप होता.
“छत्रपतींचं नाव ‘स्पॉन्सरशिप’वर विकता येत नाही. आचार्य अत्रेंचा सन्मान ‘ब्रँड डील’नं कधीच होऊ शकत नाही. महाराष्ट्राची अस्मिता कुठल्याही कंपनीच्या बोलीवर विकली जाणार नाही. ही लढाई नावांची नाही, ही लढाई आहे महाराष्ट्राच्या सन्मानाची आणि स्वाभिमानाची. १३ कोटी महाराष्ट्रवासीयांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे,” असं गायकवाड यांनी ठणकावून सांगितलं.
“मुंबई काँग्रेस आणि सर्व महाराष्ट्रप्रेमी या अपमानाविरोधात एकदिलानं लढणार आहेत. न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहील,” असा निर्धार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.


