मुंबई प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या प्रतिनिधीमंडळाने महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग आणि गंभीर प्रशासकीय त्रुटींची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली.
या भेटीवेळी शिवसेना उपनेत्या आणि माजी आमदार विशाखा राऊत, शिवसेना उपनेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेत्या व सिनेट सदस्य शितल देवरुखकर, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी महापौर स्नेहा आंबेकर, महाराष्ट्र समन्वयक रंजना नेवाळकर, तसेच विभाग संघटिका युगंधरा साळेकर उपस्थित होत्या.
महिला आघाडीच्या नेत्या यांनी या भेटीत म्हटलं की, “डॉ. मुंडे यांच्या आत्महत्येमागील सत्य बाहेर आलंच पाहिजे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.


