स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | मयुरेश बिल्डिंगसमोर, दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी येथे वाहतूक नियमभंगावर कारवाई करत असताना भायखळा वाहतूक विभागातील पोलीस शिपाई किरण सूर्यवंशी यांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसाने एका तरुणीचा जीव वाचला.

शुक्रवारी सकाळी 10.17 वाजता एमटीपी हेल्पलाइनवरून मिळालेल्या फोनवरून काळाचौकी परिसरात फूटपाथवर वाहन पार्किंगबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्या कॉलच्या अनुषंगाने रायडर पोलीस शिपाई किरण सूर्यवंशी हे कारवाईसाठी घटनास्थळी रवाना झाले. तेथे कारवाई सुरू असतानाच स्थानिकांनी त्यांना सांगितले की, जवळील आस्था नर्सिंग होमच्या केबिनमध्ये एका तरुणाने मुलीवर चाकूने हल्ला केला आहे.
या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सूर्यवंशी तात्काळ नर्सिंग होममध्ये धाव घेतली. त्यांनी आरोपीच्या ताब्यातून पीडित तरुणीची सुटका करत तिला बाहेर काढले. ती गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसल्याने त्यांनी क्षणाचा विलंब न करता तिला टॅक्सीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राणीबाग येथे दाखल केले.
तेथे प्राथमिक उपचारानंतर काळाचौकी पोलिसांच्या मदतीने जखमी तरुणीला पुढील उपचारासाठी सर जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, हल्ला करणाऱ्या तरुणाने स्वतःच्याही अंगावर वार केल्याने त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर माननीय पोलीस उपायुक्त (झोन 4), सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच काळाचौकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी रुग्णालयात भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. जखमी मुलीवर सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेचा पुढील तपास काळाचौकी पोलिसांकडून सुरू आहे.
भायखळा वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक जितेंद्र वरे यांनी किरण सूर्यवंशी यांच्या तत्पर आणि प्रशंसनीय कार्याची विशेष दखल घेतली आहे.


