
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा शहरात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण येत्या २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच अन्य मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले असून, जरांगे-पाटील यांनी या निमंत्रणाला हिरवा कंदील दिला आहे.
संतांच्या कार्याने पावन झालेल्या मंगळवेढा नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांनी ३६० वर्षांपूर्वी विजापूर स्वारीदरम्यान भुईकोट किल्ल्यात मुक्काम केला होता. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर शहरात अश्वारूढ पुतळा व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. सुरुवातीला आमदार अभिजीत पाटील यांनी पुतळा स्वखर्चातून उभारण्याचे आश्वासन दिले होते; मात्र नंतर सकल मराठा समाजाने सर्वसमावेशक लोकसहभागातून हा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला.
या उपक्रमासाठी तब्बल ३१ लाख रुपये लोकसहभागातून जमा करण्यात आले. मूर्तिकार महेंद्र धोपटे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या १८ फूट उंच, ४.५ टन वजनाच्या अश्वारूढ मूर्तीची गेल्या वर्षी पुण्याहून मंगळवेढ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सुशोभीकरणासाठी शासनाने ७५ लाखांचा निधी मंजूर केला असून, संबंधित कामांना गती मिळाली आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत आ. समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, तसेच खा. संभाजीराजे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे-पाटील यांना औपचारिक निमंत्रण दिले, आणि त्यांनी तत्काळ स्वीकारही केला.
यावेळी समाजाच्या वतीने ज्ञानेश्वर कोंडूभैरी, सतीश दत्तू (वारी परिवार अध्यक्ष), प्रा. विनायक कलुबर्मे, चंद्रकांत काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
“लोकसहभागातून साकारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा मंगळवेढा शहराच्या सौंदर्यात भर घालणार असून, बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करेल,”
अजित जगताप, अध्यक्ष, अश्वारूढ पुतळा समिती