
मुंबई प्रतिनिधी
आनंद, उत्साह आणि आपुलकीचा असा दिवाळीचा सण सध्या देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. दिवाळीतील प्रत्येक दिवसाला आपलं खास महत्त्व असतं. त्यातही भाऊबीज हा सण बहिणी-भावाच्या अतूट नात्याचं प्रतीक मानला जातो. दिवाळीच्या उत्सवाला समारोप घालणारा हा दिवस प्रेम, स्नेह आणि आपुलकीनं भरलेला असतो.
• भाऊबीज कधी आहे?
हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. यंदा द्वितीया तिथी 23 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजून 46 मिनिटांपर्यंत राहील. त्यामुळे भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी साजरी करणे शुभ ठरणार आहे.
भावाला ओवाळण्याचा सर्वोत्तम मुहूर्त
• दुपारी 1.13 ते 3.28 या वेळेत भाऊरायाला ओवाळणे सर्वाधिक शुभ मानले जात आहे.
• भाऊबीजेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
भाऊबीज हा सण केवळ एक परंपरा नसून भावनिक बंध दृढ करणारा दिवस आहे. शास्त्रानुसार, कार्तिक शुक्ल द्वितीयेला यम आपल्या बहिण यमुना हिच्या घरी गेला होता. बहिणीच्या प्रेमाने प्रसन्न होऊन यमाने वर दिला की या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडे जाईल, त्याला मृत्यूनंतर यमलोक भोगावा लागणार नाही.
दुसऱ्या कथेनुसार, नरकासुराचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेत परतले. त्यावेळी त्यांच्या बहिणी सुभद्रेनं फुलं, मिठाई आणि दिव्यांनी त्यांचं स्वागत केलं. कपाळावर टिळा लावून तिनं त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. तेव्हापासून भाऊबीज साजरी करण्याची परंपरा सुरू झाली, असं मानलं जातं.
• सणामागील भावना
या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. गोडधोड, भेटवस्तू आणि एकत्र वेळ घालवण्याच्या माध्यमातून हा सण अधिक गोड आणि अविस्मरणीय बनतो.
आपुलकीचा हा सण, लाडक्या भावंडांच्या नात्याला नवचैतन्य देणारा ठरतो.