
सांगली प्रतिनिधी
मोबाईल परत घेण्यावरून उद्भवलेल्या वादात खानापूर येथे एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलच्या कारणावरून जावेद मुबारक अत्तार (वय ४२) याने जयंत विश्वास भगत (वय ४०, दोघेही खानापूर) याचा खून केल्याची कबुली अत्तारने दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली.
ही घटना विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर येथील एका दुकानासमोर घडली. जयंत भगत याने अत्तारकडून स्वतःचा मोबाईल परत मागितल्याने वाद झाला. या वादातून अत्तारने चाकूने जयंतच्या गळ्यावर वार करून त्याचा जागीच खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर अत्तार घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून त्याला अटक केली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला मंगळवारी विटा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोन दिवस पोलिस कोठडीचा आदेश दिला.
या प्रकरणी मृत जयंत भगत यांची आई रंजना विश्वास भगत (वय ६५) यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.