
सांगली प्रतिनिधी
सांगली : ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरात खळबळ उडवणारी हत्या घडली आहे. वसंतदादा औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी मध्यरात्री एका २४ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पूर्वीच्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. संजयनगर पोलिसांनी संशयित आदेश मधुकर डोईफोडे (वय २४, चिंतामणीनगर झोपडपट्टी) याला अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव रोहित लक्ष्मण आवळे (वय २४, चिंतामणीनगर झोपडपट्टी) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित व आदेश हे दोघेही शेजारी राहात होते आणि मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्याची चर्चा परिसरात होती. शुक्रवारी रात्री रोहित, आदेश आणि आणखी दोन तरुण दारू पिण्यासाठी वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील एका पडक्या इमारतीसमोर जमले.
काही वेळाने इतर दोघे निघून गेल्यानंतर, आदेश आणि रोहित यांच्यात पुन्हा वाद झाला. नशेत असताना झालेल्या या वादात आदेशने रोहितला मारहाण केली आणि त्यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला.दरम्यान, वसाहतीमधील रात्रपाळीवरील काही कामगारांना या दोघांचा गोंधळ ऐकू आल्याने त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याचवेळी परिसरात गस्त घालत असलेल्या संजयनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.
त्यांनी त्वरित गर्दी हटवून पाहणी केली असता, रोहित मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. घटनास्थळावर रक्ताने माखलेला मोठा दगड सापडला आहे.पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संशयिताचा शोध घेत काही वेळातच त्याला पकडले.
चौकशीत आदेश डोईफोडे याने वादातून खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी लक्ष्मण घेरडे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सुरू आहे.संजयनगरातील वाढते गुन्हेसंजयनगर परिसरात अलिकडच्या काळात गुन्हेगारी वाढल्याची नागरिकांकडून तक्रार होत आहे. पूर्वीच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर येथे कठोर कारवाई करणारा अधिकारी नेमावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती. परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी यात तातडीने हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.