
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील उन्हाचा कडाका काही दिवसांपासून जाणवतोय. अनेक भागांमध्ये तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा योग आहे, काही भागात मेघगर्जनेसह पावसाचीही शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात सोमवारी सायंकाळी कमी दाब क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी रायगड, रत्नागिरी, ठाणे तसेच संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.
गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढले असून मुंबईसह इतर भागांमध्ये उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून तापमान ३३-३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जात आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३४.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.
मुंबईतही पुढील दोन–तीन दिवस पावसाची शक्यता असल्याने तापमानात घट होऊन दिलासादायक वातावरण अनुभवता येईल. मंगळवारी सायंकाळनंतर मुंबईसह ठाण्यात पावसाचा इशारा दिला गेला. फोर्ट, दादर, परळ, पवई तसेच आसपासच्या भागात हलक्या सरींनी पावसाने हजेरी लावली.
नवी मुंबईतील नेरुळ, बेलापूर, खारघर तसेच ठाणे परिसरात मंगळवारी दुपारी ४ नंतर मेघगर्जनेसह पावसाने कोसळले. या वेळी जोरदार वारे वाहत होते. साधारण अर्धा तास मुसळधार पावसाने जोर दाखवला, त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरू होती.
ब्रह्मपुरी येथे मंगळवारी राज्यात सर्वाधिक ३६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले. त्याखालोखाल चंद्रपूर ३३.६, लोहगाव ३४.५, रत्नागिरी ३६ आणि डहाणू ३६.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले.