
इंदूर वृत्तसंध्या
इंदूर : पैशाच्या आणि प्रतिष्ठेच्या वादाने किन्नर समाजात कलह माजला आहे. तब्बल १५० कोटी रुपयांच्या संपत्तीवरून दोन गटात संघर्ष पेटला असून, या वादात २४ किन्नरांनी फिनाईल पिऊन सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. धार्मिक मतभेद आणि धर्मांतराच्या दबावाचाही या वादाशी संबंध असल्याचे वृत्त आहे.
इंदूरमधील नंदललपुरा परिसरात दोन किन्नर गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. काल रात्री या वादाची परिसीमा गाठत २४ किन्नरांनी फिनाईल पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याने सर्वांना वाचवण्यात यश आले.
घटनेनंतर भाजप नेते, खासदार, आमदार आणि नगराध्यक्षांनी पोलीस आयुक्तांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. नगराध्यक्ष सुमित मिश्रा यांनी सांगितले की, “असली आणि नकली किन्नरांचा वाद संपवण्यासाठी सर्वांची वैद्यकीय तपासणी आणि अधिकृत नोंदणी केली जाणे आवश्यक आहे. तसेच बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
अधिवक्ता सचिन सोनकर यांनी गंभीर आरोप करताना सांगितले, “काही मुस्लिम किन्नर हिंदू किन्नरांवर धर्म परिवर्तनासाठी दबाव आणतात. धर्मांतरास नकार दिल्यास एचआयव्हीचे इंजेक्शन टोचण्याची धमकी दिली जाते.” दुसऱ्या गटातील किन्नर सोनम भास्कर हिने मात्र याला विरोध करत सांगितले, “वाद पैशांच्या वाटपावरून सुरु झाला. रेल्वेत भिक्षा मागून मिळणाऱ्या रकमेच्या वाटणीवरून तणाव निर्माण झाला. आत्महत्येचा प्रयत्न हा फक्त लक्ष वेधण्याचा प्रकार आहे.”
पोलिसांच्या तपासानुसार, दोन्ही गटांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता असून, नंदललपुरामध्ये आलिशान घरे, महागड्या गाड्या आणि दागदागिने आहेत. त्यामुळे हा वाद धार्मिक तसेच आर्थिक हितसंबंधांशी निगडित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राजस्थानच्या कोटपूतली-बहरोड जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या घटनेचीही आठवण ताजी झाली आहे. तिथे प्रसिद्ध किन्नर गुरु मधु शर्मा यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या पार्श्वभूमीवर इंदूरमधील किन्नर समाजातील तणावाला आणखी गंभीर वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, दोन्ही गटातील प्रमुखांची चौकशी केली जात आहे. धार्मिक तणाव आणि पैशांच्या देवाणघेवाणीमागील संबंधही तपासले जाणार आहेत.