
सातारा प्रतिनिधी
साताऱ्याजवळील सासपडे गावात अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या झाल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात न्यायाची गती वाढवण्यासाठी आरोपीविरुद्धची केस फास्टट्रॅक न्यायालयात चालवली जाणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
चाकणकर यांनी गुरुवारी सासपडे येथे जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते. चाकणकर यांनी सांगितले की, “आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाकडून शिफारस करण्यात येईल. चव्हाण कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल. तसेच पीडित कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलीस संरक्षण देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सासपडे सारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी चाकणकर यांनी पोलीस विभागाला स्पष्ट सूचना दिल्या “पोक्सोअंतर्गत गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असलेले लोक काय करत आहेत, याची चौकशी करा. कोणी गैरकृत्य करत असल्यास तातडीने कारवाई करा.”
राज्य महिला आयोगाने या प्रकरणाला न्यायाच्या दिशेने वेग देण्याचा निर्धार व्यक्त केला असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे.