
चंदीगड प्रतिनिधी
हरियाणातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या मृत्यूला पाच दिवस उलटूनही अद्याप त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. शवविच्छेदनाबाबत कुटुंबियांनी आक्षेप घेतल्याने प्रक्रिया रखडली आहे.
मंगळवारी (ता. ७) वाय. पूरन कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पोलिस आणि प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. मात्र, कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी परवानगी दिली नसल्याने अंत्यसंस्कारात अडथळा निर्माण झाला आहे.
घटनेनंतर हरियाणाचे डीजीपी सागर प्रीत हुड्डा आणि आयजी पुष्पेंद्र कुमार यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबाच्या संमतीनंतरच शवविच्छेदन करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या आधी पार्थिव कुटुंबीयांना दाखवण्यात येणार आहे.
दरम्यान, पूरन कुमार यांच्या आयएएस पत्नीने पोलिसांना पत्र लिहून एफआयआरमधील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केला आहे. एफआयआरमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे नमूद नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत सिंह आणि रोहतकचे एसपी नरेंद्र बिजारिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूरन कुमार यांचे मेहुणे व आम आदमी पक्षाचे आमदार अमित रतन यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “कुटुंबीयांची परवानगी नसतानाही शवविच्छेदनाची तयारी सुरू करण्यात आली. पार्थिव हलवताना प्रशासनाने आम्हाला फसवलं,” असं त्यांनी म्हटलं. “पाच दिवस उलटले तरी न्याय मिळालेला नाही,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणी शवविच्छेदनासाठी डॉक्टरांचे एक विशेष पॅनल तयार करण्यात येणार आहे. काँग्रेस नेते हरिश रावत यांनी पूरन कुमार यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत “एका प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू धक्कादायक आहे,” अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, चंदीगड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या पथकाकडून पूरन कुमार यांच्या आत्महत्येचे खरे कारण आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जाणार आहे.