
सातारा प्रतिनिधी
“दुर्गम भागातील शिक्षण संस्थांना बळ देणे आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बनविणे हे महायुती सरकारचे प्राधान्य आहे,” असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. राज्यातील पाच लाख विद्यार्थिनींना ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत दरमहा दोन हजार रुपयांची पॉकेट मनी देण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली.
बाळासाहेब देसाई महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रम, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा आणि विस्तारित इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अतुल भोसले होते. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, अमित कुलकर्णी, अमरसिंह पाटणकर, राजाभाऊ शेलार, हिंदूराव पाटील, प्राचार्य शिरीष पवार आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, “आज जगात पैसा ही संपत्ती नसून ज्ञान हीच खरी संपत्ती ठरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत मागे राहू नये म्हणून शिक्षण सुविधांचा विस्तार सुरू आहे. मुलींना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी मुलींच्या वसतिगृहांची संख्या वाढविण्याचे नियोजन केले आहे.”
ते पुढे म्हणाले, “परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात प्रवेशाची संधी देण्याचा विचार सरकार करत आहे. ‘कमवा आणि शिका’ योजनेद्वारे आर्थिक सक्षमता तर वाढेलच, पण शिक्षणासोबत रोजगाराचेही दालन विद्यार्थ्यांसाठी खुले होईल.”
आमदार डॉ. भोसले म्हणाले, “चंद्रकांत पाटील वेळेचे पक्के आणि शब्दाला जागणारे मंत्री आहेत. मुलींना मोफत शिक्षण देण्याचा त्यांचा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी दूरगामी ठरेल. खासगी विद्यापीठांची स्थापना आणि शिक्षकांना प्रोत्साहन देणे यावरही सरकार कटिबद्ध आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीव चव्हाण यांनी केले. याज्ञसेन पाटणकर यांनी स्वागत केले, तर आभार प्राचार्य शिरीष पवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी आमदार डॉ. भोसले यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना सल्ला देताना म्हटले, “सल्ला देणाऱ्यांपासून आणि कौतुक करणाऱ्यांपासून सावध राहा. सरकारमध्ये राहून राजकीय चलाखी आत्मसात करा.”