
सातारा प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी आणि अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव बी. एम. संदीप हे रविवारी (दि. १२) सातारा दौऱ्यावर येत असून, जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत ते पक्ष संघटनेविषयी सविस्तर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात ‘मत चोर, गद्दी छोड’ या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या स्वाक्षरी अभियानालाही ते भेट देणार आहेत.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हे सकाळी साडेदहा वाजता शाहूपुरी येथे सातारा शहर, तालुका आणि युवक काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. या कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, पक्षाच्या चालू मोहिमेला चालना देणार आहेत.
यानंतर अकरा वाजता ते काँग्रेस भवनातील महात्मा गांधी सभागृहात जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासंदर्भात आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यानंतर संदीप सांगलीकडे रवाना होतील. दरम्यान, शाहूपुरी व काँग्रेस भवनातील कार्यक्रमांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले आहे.