
सांगोला प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षातील अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्या धर्मपत्नी रतनबाई देशमुख आता बंडखोरांचा समाचार घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.
आमचे नाव किंवा फोटो वापराल तर खबरदार, असा इशाराच त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षातील बंडखोर नेत्यांना दिला आहे. या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे.
शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सध्या रतनबाई देशमुख यांचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओतून रतनबाई देशमुख यांनी बंडखोर नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. या व्हिडिओतून त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांनी यापुढे स्व. गणपतराव देशमुख यांचा तसेच आपला फोटो वापरायचा नाही किंवा नावही वापरायचे नाही, अशी ताकीद दिली आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी पुन्हा आमच्या दारात यायचे नाही. जे काही होईल त्याला टक्कर द्यायला शेकाप आणि आम्ही समर्थ आहोत, असेही स्पष्ट केले आहे.
शेकापतील ज्येष्ठ नेते उद्योजक बाळासाहेब एरंडे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. त्यांच्याबरोबर अनेक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, सभापती, विद्यमान सरपंच आणि पक्षाचे पदाधिकारी जाणार आहेत.
आमदारांचे मौन, रतनबाई देशमुख यांचा इशारा
सध्या तालुक्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. शेकापमधील अनेक कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असताना सुद्धा विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मौन बाळगले आहे. परंतु स्व. गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांचा व्हिडिओच्या माध्यमातून बंडखोरांना इशारा दिला आहे.