
चेन्नई प्रतिनिधी
मध्य प्रदेशात घडलेल्या विषारी कफ सिरप प्रकरणात अखेर मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. २१ निष्पाप बालकांचे प्राण घेणारे घातक ‘कोल्ड्रिफ’ सिरप तयार करणाऱ्या ‘स्रेसन फार्मास्युटिकल्स’ या कंपनीचा मालक जी. रंगनाथन (वय ७३) यांना चेन्नईमधून अटक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश पोलिसांच्या सात सदस्यीय विशेष पथकानं ही कारवाई केली असून, रंगनाथन यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तपासात ‘स्रेसन फार्मास्युटिकल्स’ या कंपनीने तयार केलेलं सिरप दर्जाहीन आणि विषारी असल्याचं उघड झालं आहे.
* कोण आहेत जी. रंगनाथन?
जी. रंगनाथन हे चेन्नईतील अनुभवी औषध व्यवसायिक आहेत. त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून फार्मसीचे शिक्षण घेतले असून, मागील चार दशकांपासून औषध उद्योगात कार्यरत होते. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीच्या सुरुवातीस त्यांनी ‘प्रोनीट’ नावाचं पौष्टिक सिरप बाजारात आणलं होतं.
१९८० च्या दशकात हे उत्पादन मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालं. सुरुवातीला सरकारी परवानगी नसल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला होता, परंतु रंगनाथन यांनी सर्व कायदेशीर परवानग्या मिळवत व्यवसाय वाढवला. पुढे त्यांनी अनेक लहान-मोठ्या उत्पादन युनिट्स उभारून ‘स्रेसन फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी स्थापन केली. हीच कंपनी ‘कोल्ड्रिफ’ हे घातक सिरप तयार करत होती.
* विषारी सिरपमुळे २१ बालकांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील विविध भागांत हे सिरप घेतल्यानंतर तब्बल २१ मुलांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान चेन्नई-बंगळूर महामार्गावरील कंपनीचे दोन हजार चौरस फूटांचे उत्पादन युनिट आणि कोडंबक्कम येथील नोंदणीकृत कार्यालय सील करण्यात आले.
* प्रयोगशाळेतील धक्कादायक निष्कर्ष
तामिळनाडूतील प्रयोगशाळांमध्ये ‘कोल्ड्रिफ’ सिरपचे नमुने तपासण्यात आले असता त्यात ४८.६ टक्के डायथिलीन ग्लायकोल हा अत्यंत विषारी रासायनिक घटक आढळला. हा पदार्थ मानवी शरीरासाठी घातक ठरत असून मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू ओढवू शकतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
* कंपनीवरील बंदी, तपासाला वेग
या घटनेनंतर मध्य प्रदेश सरकारनं ‘स्रेसन फार्मास्युटिकल्स’च्या सर्व औषधांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, जी. रंगनाथन यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील पुढील तपासाला गती मिळाली आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकरणाचा विस्तार केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून अन्य राज्यांमधील औषध पुरवठा साखळीतही तपास वाढवण्यात येणार आहे.
औषध उद्योगातील निष्काळजीपणा आणि नफेखोर वृत्तीने पुन्हा एकदा निरपराधांचे जीव घेतले आहेत. या घटनेनंतर देशभरात औषधांच्या गुणवत्तेबाबत कठोर नियमांची गरज अधोरेखित झाली आहे.