
सोलापूर प्रतिनिधी
गेल्या पंधरवड्यापासून मराठवाड्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांची शेती उध्वस्त झाली असून संसार उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहे. जमीन वाहून गेली, उभ्या पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी दौऱ्यावर निघाले आहेत. मात्र, अद्याप मदतीचा गंधही ग्रामीण भागाला लागलेला नाही, अशी शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीला गेले. पासलेवाडी येथे काही मदतकीटांचे वाटप झाले असले तरी गावकऱ्यांनी,’प्रत्यक्षात मदत पोहोचलीच नाही” असे स्पष्टपणे सांगितले. उंदरगावातील शेतकऱ्यांनी प्राण्यांसाठी चारा आणि लोकांसाठी जेवणाच्या तुटवड्याची समस्या मांडली. त्यावर भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात तर शेतकऱ्यांनी मंत्र्यांचा ताफाच अडवला. गावातील सरपंच संभाजी बेंद्र यांनी आपल्या घरात २० फूट पाणी घुसल्याची व्यथा मांडली. “आजवर बिस्कीटचा पुडासुद्धा मिळाला नाही, असे सांगताना ते हुंदके देऊ लागले. त्यावेळी भरणे यांनी त्यांना धीर देत,’सरकार तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका,”असा दिलासा दिला.
या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटीलही उपस्थित होते. त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत, “तुम्ही म्हणता मदत पोहोचली, पण प्रत्यक्षात काहीच नाही, असा संतप्त सवाल केला. अधिकाऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून मदत पोहोचवली असल्याचा दावा केला असला तरी गावकऱ्यांनी तो फेटाळला.
भरणे यांनी यावेळी सर्व अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले. पूरग्रस्तांना ५ हजार रुपये मदत आणि आवश्यक साहित्य पुरवले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, बँकांनी कर्जवसुलीचा तगादा लावू नये, यासाठी निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीना-कोळेगाव धरणातून अनियंत्रित पाणी सोडल्यामुळे पूरस्थिती अधिक गंभीर झाली. या संदर्भात चौकशी होईल आणि निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे भरणे म्हणाले.
पूरग्रस्त भागात अद्याप मदत न मिळाल्याने लोकांमध्ये अस्वस्थता व रोष आहे. पिकांचे नुकसान, जनावरांसाठी चारा आणि माणसांसाठी अन्नाचा तुटवडा यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा वाढली आहे. सरकारकडून तातडीची व पुरेशी मदत मिळावी, हीच त्यांची आर्त मागणी आहे.