
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने सिना नदीला पूर आला असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. प्रशासन मदतकार्यात गुंतलेलं असतानाच, मदतीच्या नावाखाली राजकारण रंगताना दिसलं. याच पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे शिवसेना (शिंदे गट) नेत्या व प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची थेट फजिती झाल्याचा प्रकार घडला.
पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप करताना वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन करून प्रशासनावर अपुरी मदत पुरवल्याचा ठपका ठेवण्याचा प्रयत्न केला. गावात 3,000 लोकसंख्या असूनही कमी प्रमाणात मदत मिळत असल्याची तक्रार त्यांनी केली.
मात्र, शांतपणे उत्तर देतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारे यांना प्रतिप्रश्न केला “तुम्ही सध्या त्या गावात आहात, तर तुम्ही किती किट आणल्या आहेत? या प्रश्नावर वाघमारे यांच्याकडे ठोस उत्तर नव्हतं. कारण गावासाठी त्यांनी फक्त 200 किटच आणले होते.
याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरच वाघमारे यांना खडेबोल सुनावत, आता राजकारण करण्याची वेळ नाही, तुमचं राजकारण नंतर करा. आम्ही शक्य होईल तितकी मदत करत आहोत, असा दमदार सज्जड इशारा दिला.
पूरासारख्या संवेदनशील परिस्थितीतही मदतकार्यातून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न झाल्याने हा प्रकार सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.