
सोलापूर प्रतिनिधी
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील ४१ गावे पूर्णपणे अंधारात बुडाली आहेत. महावितरणच्या पाच सबस्टेशनमध्ये पाणी शिरल्याने आणि जवळपास १५०० ट्रान्स्फॉर्मर पाण्याखाली गेल्याने वीजपुरवठा कोलमडला आहे. येत्या किमान आठ दिवसांपर्यंत या गावांमध्ये वीजपुरवठा पुन्हा सुरू होणे अवघड असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.
पूराचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला आहे. सीना नदीकाठावर तब्बल ९३ हजार हेक्टर फळबागा व उसाचे क्षेत्र आहे. पाणी उचलण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पदरमोड करून ट्रान्स्फॉर्मर बसविले होते; मात्र पुराच्या पाण्यात ६० हून अधिक ट्रान्स्फॉर्मर वाहून गेले आहेत, तर दीड हजारांवर ट्रान्स्फॉर्मर पाण्यात बुडाल्याने ते नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे वीज नसल्याने सिंचन थांबले असून, मोठ्या प्रमाणावर शेती धोक्यात आली आहे. सरकारने तातडीने नवे ट्रान्स्फॉर्मर बसवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कोणकोणती गावे अंधारात?
* आवाटी सबस्टेशन : नेर्ले, आवाटी, निमगाव, गावंधरे
* भांबेवाडी सबस्टेशन : भांबेवाडी, अष्टे, खुनेश्वर, मलिकपेठ, हिंगणी
* औराद सबस्टेशन : औराद, संजवाड
* कुंभेज सबस्टेशन : कुंभेज, खैराव, वाकाव
* लांबोटी सबस्टेशन : श्रीपूर, लांबोटी, अर्जुनसोंड, साबळेवाडी, सावळेश्वर, मुंढेवाडी, मोरवंची, रामहिंगणी
* वडकबाळ सबस्टेशन : वडकबाळ, हत्तूर, वांगी, मनगोळी, राजूर, सिंदखेड, व्हनमूर्गी, संजवाड, बंदलगी
* कोर्सेगाव सबस्टेशन : कोर्सेगाव, शेगाव, सुलेरजवळगे, उबांटे, कलकर्जाळ, नजीकचिंचोली, केगाव बुद्रूक, केगाव खुर्द
* गुड्डेवाडी सबस्टेशन : गुड्डेवाडी, आळगी, अंकलगी
या सर्व गावांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित आहे. चिखल कमी झाल्यानंतरच सबस्टेशन व ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीचे काम हाती घेता येईल, तोपर्यंत गावकऱ्यांना अंधारातच दिवस काढावे लागणार आहेत.