
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून पूरस्थिती गंभीर झाली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावे व शेती पाण्याखाली गेली आहेत. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मात्र पावसाचा हा कहर अजून काही दिवस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात २४ सप्टेंबरपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे २८ सप्टेंबरपर्यंत राज्यभरात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू राहणार आहे. २५ सप्टेंबरपर्यंत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून २६ सप्टेंबरपासून कमी दाबाचा पट्टा अधिक प्रभावी होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मराठवाड्यात अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड, धाराशिवसह विविध जिल्ह्यांत नद्यांना पूर आला असून धरणांमधून विसर्ग सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरसह काही भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, धुव्वाधार पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. प्रशासन सतर्क असून मदत व बचाव कार्य गतीमान करण्यात आले आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.