
नवी दिल्ली प्रतिनिधी
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून आजपासून बदललेले जीएसटी दर लागू झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अंघोळीच्या साबणापासून ते पिझ्झा-बर्गरपर्यंतच्या वस्तू आता कमी किमतीत मिळणार आहेत. येत्या सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खिशाला हायसं वाटणार आहे.
सरकारने काही वस्तूंना शून्य टक्के जीएसटी तर काहींना फक्त ५ टक्के जीएसटी लावला आहे. यामध्ये खाद्यपदार्थ, शैक्षणिक साहित्य, आरोग्यसेवा यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
शून्य टक्के जीएसटीतील वस्तू
• खाद्यपदार्थ : UHT दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड, रेडी टू इट चपाती-पराठा, खाखरा
• शैक्षणिक साहित्य : पेन्सिल, वही, चार्ट, प्रयोगशाळेतील वह्या, आलेखपुस्तक, नकाशे, अनकोटेड पेपर व पेपरबोर्ड
• आरोग्य क्षेत्र : ३३ जीवनरक्षक औषधे, वैयक्तिक आरोग्य विमा, जीवन विमा
५ टक्के जीएसटीतील वस्तू
• खाद्यपदार्थ : वनस्पती तेल, बटर, तूप, साखर, मिठाई, पास्ता, बिस्कीट, चॉकलेट, ज्यूस, नारळपाणी
• वैयक्तिक वापर : शाम्पू, तेल, साबण, शेव्हिंग क्रीम, टूथपेस्ट, दंत फ्लॉस, टॉयलेट साबण
• घरगुती वस्तू : मुलांची दुधाची बाटली, छत्री, मेणबत्त्या, शिलाई मशीन, डायपर्स, हँडबॅग, फर्निचर
• कृषी साहित्य : ट्रॅक्टर, कृषी उपकरणे, सिंचन साहित्य, पंप
• वैद्यकीय वस्तू : थर्मामीटर, ग्लुकोमीटर, ऑक्सिजन, चष्मा, हातमोजे
• इतर : हस्तनिर्मित कागद, नक्षीकामाच्या वस्तू, वीटा, टाईल्स, कार्टन्स
१८ टक्के जीएसटीतील वस्तू
• इलेक्ट्रॉनिक वस्तू : एसी, वॉशिंग मशीन, एलईडी-एससीडी टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर
• वाहने : लहान कार, तीनचाकी, रुग्णवाहिका, ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी, व्यापारी वाहने
• इंधन व कोळसा : हायड्रोलिक इंधन, इंधन पंप, कोळसा व त्यापासून बनवलेले घन इंधन
• सिमेंट उत्पादने : पोर्टलँड, ॲल्युमिनियम, स्लॅग, सुपर सल्फेट व इतर हायड्रॉलिक सिमेंट
सरकारच्या या निर्णयामुळे आगामी दसरा,दिवाळीचा सण खरेच गोड आणि परवडणारा ठरणार आहे. ग्राहकवर्गाला याचा थेट फायदा मिळणार असून महागाईपासून थोडाफार दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.