
नवी दिल्ली वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना जीएसटी सुधारणा आणि आगामी सणासुदीच्या काळाचा उल्लेख केला. “आजपासून नवरात्रीसह देशभरात जीएसटी उत्सवाची सुरुवात होत आहे. या उत्सवामुळे तुमची बचत वाढेल आणि खरेदी सोपी होईल. प्रत्येक कुटुंबाचा आनंद दुपटीने वाढेल,” असे मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले, “हा रिफॉर्म भारतातील कारभार अधिक सुलभ करेल. गुंतवणुकीला चालना देईल. आणि सर्व राज्यांना विकासाच्या स्पर्धेत समान संधी मिळवून देईल. २०१७ मध्ये जीएसटी लागू होताना जुन्या टॅक्स प्रणालीचा अंत करून नव्या युगाची सुरुवात झाली होती. त्या आधी देशातील व्यापार, वाहतूक आणि उद्योग अनेक टॅक्स व टोलच्या जाळ्यात अडकले होते. त्याचा फटका शेवटी सर्वसामान्य ग्राहकांना बसत होता. त्यातून देशाला मुक्त करण्यासाठी जीएसटीला आम्ही प्राथमिकता दिली,” असे ते म्हणाले.
‘वन नेशन, वन टॅक्स’
पंतप्रधानांनी यावेळी ‘वन नेशन, वन टॅक्स’ या संकल्पनेलाही अधोरेखित केले. “रिफॉर्म ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. काळ आणि गरजेनुसार बदल आवश्यक असतात. त्यामुळेच आता देशात नवीन जीएसटी रिफॉर्म लागू होत आहेत. आता फक्त ५% टॅक्स स्लॅब राहील. अन्नधान्य, औषधे, साबण, स्वास्थ्य व जीवनविमा यांसारख्या आवश्यक वस्तू व सेवांवर टॅक्स शून्य किंवा नगण्य असेल. ज्या वस्तूंवर पूर्वी १२% कर लागू होता, त्यातील ९९ टक्के आता ५% मध्ये येतील, असे मोदी म्हणाले.
मोदींनी सांगितले की मागील ११ वर्षांत तब्बल २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर पडून निओ मिडल क्लासमध्ये आले आहेत. “या घटकाची स्वतःची स्वप्ने आहेत. यंदा सरकारने २ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करमाफी जाहीर केली आहे. आता गरीब आणि निओ मिडल क्लासची वेळ आहे,” असे मोदींनी नमूद केले.