
भुवनेश्वर वृत्तसंस्था
एकेकाळी ओडिशा सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अव्वल ठरलेले व प्रशासकीय सेवेत ‘आदर्श अधिकारी’ म्हणून गणले गेलेले तहसीलदार अश्विनी कुमार पांडा अखेर भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकले. अवघ्या १५ हजार रुपयांच्या लाच प्रकरणात त्यांना ओडिशा दक्षता विभागाने संबलपूर जिल्ह्यातील बामरा येथे रंगेहात पकडले.
दक्षता विभागाच्या माहितीनुसार, शेतजमिनीचे होमस्टेड जमिनीत रूपांतर करण्यासाठी पांडाने तक्रारदाराकडे २० हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराने अनाकलनीयता व्यक्त केल्यानंतर तहसीलदाराने १५ हजार रुपयांत सौदा निश्चित केला व परवानगी नाकारण्याची धमकी दिली. तक्रारदाराने दक्षता विभागाशी संपर्क साधताच शुक्रवारी सापळा रचण्यात आला.
कारवाईदरम्यान पांडा चालकाच्या माध्यमातून तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. घटनास्थळावरून १५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त झाली. त्याचा चालक पी. प्रवीण कुमार यालाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पांडाच्या भुवनेश्वरमधील निवासस्थानी तसेच पीडब्ल्यूडी आयबी वसतिगृहात छापे टाकण्यात आले. या तपासात तब्बल ४ लाख ७३ हजार रुपयांची रोकड जप्त झाली.
शैक्षणिक व प्रशासकीय वाटचाल
३२ वर्षीय अश्विनी पांडा याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले असून २०१९ मध्ये ओडिशा सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. डिसेंबर २०२१ मध्ये तो ट्रेनिंग रिझर्व्ह ऑफिसर म्हणून रुजू झाला. त्यानंतर मयूरभंज जिल्ह्यातील शामाखुंटा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत राहून त्याची बदली बामरा येथे झाली होती.
राज्यसेवेतील उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने उराशी बाळगणारा हा तरुण अधिकारी अखेर लाचखोरीच्या प्रकरणात गजाआड पोहोचला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दक्षता विभाग करत आहे.