
नवी दिल्ली वृत्तसंस्था
नोएडा : मुलाच्या आजारपणाला कंटाळून आईने ११ वर्षीय मुलासह १३ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ग्रेटर नोएडातील ऐस सिटी सोसायटीत घडली. घटनेवेळी पती घरातच झोपलेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी चावला या पती दर्पण आणि मुलगा दक्ष यांच्यासह राहत होत्या. दक्ष गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होता. त्यावर औषधोपचार सुरू होते. मात्र तब्येतीत काहीही सुधारणा न झाल्याने साक्षी सतत तणावाखाली राहत होत्या. त्यांनी नोकरीही सोडली होती.
शेजाऱ्यांनी सांगितले की, मुलाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून चावला दाम्पत्य गुरुद्वारांमध्येही जात असत. परंतु प्रयत्नांना यश आले नाही. शुक्रवारीच साक्षी पंजाबमधून मुलासाठी औषधे घेऊन आल्या होत्या. आपल्या मुलाला कधीच एकटे न सोडणाऱ्या साक्षी यांच्यावर मानसिक ताण वाढत गेला आणि अखेरीस त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.
पोलिस तपासात फ्लॅटच्या बाल्कनीत खुर्ची आढळली आहे. साक्षी यांनी आधी मुलाला खाली ढकलले आणि त्यानंतर स्वतः उडी मारली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेपूर्वी साक्षी यांनी आत्महत्येची चिठ्ठी लिहून ठेवली होती. “सॉरी, आम्ही जग सोडतोय. तुम्हाला आणखी त्रास नाही द्यायचा. आमच्यामुळे आयुष्य खराब करू नका. आमच्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही,” असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.
साक्षी आणि दर्पण यांचे १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ते मूळ उत्तराखंडमधील गढीनेगी गावचे रहिवासी असून नोकरीनिमित्त नोएडात स्थायिक झाले होते. साक्षी इंजिनिअर म्हणून काम करत होत्या. पण मुलाच्या आजारपणामुळे त्यांनी नोकरी सोडली होती.
घटनेच्या वेळी दर्पण हे घरातच झोपले होते. सकाळी पत्नीला मुलाला औषध द्यायला सांगून ते दुसऱ्या खोलीत गेले होते. सकाळी दहाच्या सुमारास पत्नी आणि मुलाने इमारतीवरून उडी घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.