मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्रतेबाबत अंगणवाडी सेविकांकडून मोठ्या प्रमाणावर पडताळणी करण्यात आली असून त्याचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. या प्रक्रियेत २६ लाख ३४ हजार महिलांची तपासणी झाली असून त्यात २१ वर्षांखालील, ६५ वर्षांवरील तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केल्याचे आढळले आहे.
तपासणीदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील तब्बल साडेदहा हजार तर राज्यभरातील चार लाखांहून अधिक महिला आपल्या राहत्या पत्त्यावर सापडल्या नाहीत. मात्र विवाहामुळे वेगळी झालेल्या सूना अथवा मुलींचे रेशनकार्ड विभक्त असल्यास त्यांचा लाभ बंद होणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाला अहवाल, निर्णय प्रतीक्षेत
सोलापूर जिल्ह्यातील एक लाख चार हजार महिलांची घरोघरी जाऊन तपासणी झाली. त्यापैकी दहा हजार महिलांचा पत्त्यावर ठावठिकाणा सापडला नाही. याबाबतचा सविस्तर अहवाल शासनाला देण्यात आला असून, यावरील अंतिम निर्णय शासनस्तरावर होणार असल्याचे महिला व बालकल्याण अधिकारी रमेश काटकर यांनी सांगितले.
चुकीच्या ‘आधार’मुळे लाभ दुसऱ्याच खात्यात
अर्ज भरण्याच्या वेळी आधार क्रमांक चुकीचा भरल्याने काही लाभार्थिनींना प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. शासनाने रक्कम वितरीत केली असली, तरी ती दुसऱ्याच खात्यावर जमा होत असल्याच्या तक्रारी पोर्टलवर झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अशा १५ प्रकरणांची चौकशी झाली असून, आता चुकीने जमा झालेली रक्कम परत मिळवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
पडताळणीची आकडेवारी
* अपेक्षित पडताळणी : २६.३४ लाख
* कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी : १९.३७ लाख
* पत्त्यावर न सापडलेल्या महिला : ४.२३ लाख
* पडताळणी पूर्ण झालेल्या महिला : २२.११ लाख
‘लाडकी बहीण’ योजनेतील अनियमितता आणि पडताळणीतील निष्कर्ष आता शासनाच्या पातळीवर झळकणार असून, पात्रता व लाभाच्या पुनर्विलोकनाचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.


