
मुंबई प्रतिनिधी
मुंबई :परळ-एल्फिन्स्टन रोड पूल पाडकामामुळे बेस्टच्या तब्बल अकरा बसमार्गांमध्ये तातडीने बदल करण्यात आले; मात्र हे बदल वेळेवर जाहीर न झाल्याने शनिवारी सकाळी हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
शुक्रवारी रात्रीच पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर लगेच बसमार्ग वळवले गेले; मात्र प्रवाशांना त्याची अधिकृत माहिती उशिराने मिळाली. अनेक थांब्यांवर फलक नव्हते, घोषणाही करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे लोकांनी एकमेकांकडून चौकशी करून प्रवास करावा लागला.
“कुर्ल्याहून दररोज दक्षिण मुंबईला जाते. आज तब्बल दीड तास उशीर झाला. बस कुठून मिळेल याचा मागमूस नव्हता,” असे बँक कर्मचारी अक्षता मोरे यांनी सांगितले. तर वरळीतून परळकडे जाणारे कामगार किशोर रणदिवे म्हणाले, “दोनदा बस बदलाव्या लागल्या. माहिती आधीच मिळाली असती, तर त्रास टळला असता.”
करी रोड व चिंचपोकळीमार्गे बस वळवण्यात आल्या आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. मात्र नियोजनातील त्रुटी आणि वेळेवर प्रसार न झाल्याने बेस्ट प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.